*"वारीतील महिलांची कुचंबना थांबवा; शौचालयांसाठी जागा द्या, खर्च मी करतो!" — नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांची सरकारकडे मागणी!*



ठाणे, ता. २० जुलै :

वारीच्या पवित्र प्रवासात लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंड्या घेऊन दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. या यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय असून, त्यांना शौचालयाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब अत्यंत गंभीर असून सरकारने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, अशी आर्त आणि ठाम मागणी नामवंत उद्योजक व समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनावर स्वाक्षरी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, ह.भ.प चंद्रकांत महाराज डुंबरे, ह.भ.प. केंद्रे महाराज आळंदीकर, ह.भ.प. नाना महाराज जेधे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष  दैनिक समर्थ गांवकरी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण, दैनिक समर्थ गांवकरी व्यवस्थापक संजय  फुलसुंदर, मंत्रालय प्रतिनिधी विष्णु बुरे, ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र पांडे यांनी केली आहे.


यावेळी नानजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, शासनाचे डोके ठिकाणावर आहे का?

"शासन शौचालयाच्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करत आहे. किती महिलांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार?" असा संतप्त सवाल करत ठक्कर यांनी स्पष्ट केलं की, "लाडकी बहिण योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी, वारीतील महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची सोय करणे ही खरी प्राथमिकता असायला हवी."


एन के टी ग्रुपचा मोठा पुढाकार — कोट्यवधींचा खर्च करण्यास तयार:

नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी ठाम शब्दात सांगितले की, "सरकार जागा उपलब्ध करून देईल, तर संपूर्ण शौचालयाचे बांधकाम व देखभाल मी एन के टी ग्रुपच्या माध्यमातून करणार आहे. पैशाची चिंता करू नका, वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास आम्ही तयार आहोत."


त्यांनी हेही अधोरेखित केलं की, "सरकार लक्ष देईल की नाही माहीत नाही, पण मी स्वतःच्या संकल्पाने वारीच्या सर्व प्रमुख मार्गांवर आणि पंढरपूरमध्ये मोफत शौचालय उभारणार आहे. माय माऊलीसाठी ही सेवा माझं कर्तव्य आहे."


पेट्रोल पंप चालकांची निर्लज्जता — बंद ठेवतात शौचालयं:

वारीच्या रस्त्यावर असणाऱ्या अनेक पेट्रोल पंप चालकांवरही ठक्कर यांनी जोरदार टीका केली. "वारीच्या वेळी शौचालय बंद ठेवणे म्हणजे वारकऱ्यांचा अपमान आहे. याला इंग्रज राजवटीपेक्षाही भयानक म्हणावे लागेल. अशा मुजोर पंपचालकांवर कारवाई व्हावी, कंपन्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे," अशी मागणी त्यांनी केली.


ग्रामपंचायतींना सुद्धा आवाहन:

पंढरपूर शहरात व रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर विशेषतः 'दूत पंढरी' परिसरात ज्या ठिकाणी दिंड्या उतरतात, त्या ठिकाणी शौचालयांची अत्यंत गरज असल्याचं ठक्कर यांनी नमूद केलं. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी आणि शासनाने या सामाजिक कामात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


सरकारला आता तरी जाग येणार का?

"दिवसभर महिलांना अत्यंत त्रास होतो, ही बाब शासनाला माहिती असूनही दुर्लक्ष केले जाते. हे सरकार फक्त घोषणांमध्ये मग्न आहे. आता तरी डोके ठिकाणावर आहे का, हे विचारण्याची वेळ आली आहे," अशा परखड शब्दांत ठक्कर यांनी शासनावर ताशेरे ओढले.


महत्त्वाचे मुद्दे :


शौचालयाच्या अभावामुळे महिलांची कुचंबना.

एन के टी ग्रुपकडून कोट्यवधी खर्च करण्याची तयारी.

सरकारने फक्त जागा उपलब्ध करून द्यावी.

वारीच्या मार्गावरील पेट्रोल पंप चालकांनी शौचालय बंद ठेवणे हा गंभीर प्रश्न.

राज्य सरकारने आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी त्वरित लक्ष घ्यावे.


> "लाडकी बहिण योजनेला नव्हे, लाडक्या वारकऱ्यांना शौचालय हवे — हीच खरी गरज!"

— नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला


ही मागणी केवळ एका उद्योजकाची नसून, लाखो वारकरी महिलांचा आवाज आहे. शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.