*पाचोरा गोळीबारातील अरोपींची जामनेर पोलीसांना शरणागती
*
पाचोरा शहरातील बसस्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर काल दिनांक ०४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी सायंकाळी एक थरारक घटना घडली होती. या घटनेत अज्ञात मारेकऱ्यांनी पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजीनगर येथील रहिवासी आकाश कैलास मोरे वय वर्षे (२६) या तरुणावर सिनेस्टाईलपणे बेछूट गोळीबार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडताच संपूर्ण पाचोरा शहरासह तालुका हादरुन गेला होता व आजही पाचोरा शहरातील सर्वसामान्य नागरिक तणावाखाली वावरत आहे.
या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या आकाश मोरे याचा मृतदेह पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला याच वेळी घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने पाचोरा शहरातील घटनास्थळी येऊन माहिती जाणून घेतली व पाचोरा पोलीसांना योग्य त्या सुचना देत पाचोरा शहरातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले होते.
कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.
घटना घडल्यानंतर लगेचच गोळीबार करणारे आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शोधाशोध सुरु असतांनाच आकाश मोरे याच्यावर गोळीबार करणारे आरोपी निलेश अनिल सोनवणे वय वर्षे (२७) व त्याचा दुसरा अल्पवयीन साथीदार या दोघांनी काल रात्री अंदाजे नऊ ते दहा वाजेच्यासुमारास स्वताहून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन शरणागती पत्करुन गोळीबार करण्यासाठी वापरलेले दोन पिस्तुल, एक दुचाकी व एक मोबाईल जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कासार यांच्याकडे जमा केले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून आरोपी बिनधास्तपणे स्वताहून जामनेर पोलीस स्टेशनला हजर झाल्याने या प्रकरणी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असून या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
सद्यस्थितीत आकाश मोरे याचे मारेकरी जामनेर पोलीस स्टेशनला हजर झाले असल्याने जामनेर पोलीसांकडे त्यांचा ताबा असून जामनेर पोलीस मारेकऱ्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असले तरी आजही पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

0 Comments