गावातील महिलांच्या धाडसी पुढाकारामुळे अवैध धंद्यांना आळा
पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा या गावामध्ये महिला भगिनींनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अवैध धंद्यांविरोधात एकजुटीने आवाज उठविला. महिलांनी धाडसाने पुढाकार घेऊन पोलिसांना वेळोवेळी अचूक माहिती दिल्याने गावातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली. त्यामुळे गावातील वातावरण अधिक सुरक्षित, शांततापूर्ण व कायद्याचे पालन करणारे बनले आहे.
महिलांच्या या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कल्याणी वर्मा यांनी सर्व महिला भगिनींचा सत्कार केला. यावेळी त्यांनी महिलांच्या धाडसाचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, “गुन्हेगारीविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. महिलांनी दाखविलेला हा पुढाकार इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल,” असे सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, समाजातील प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेची सुद्धा रक्षक आहे. अवैध धंदे हे अनेक कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक व नैतिक नुकसान करतात. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांना माहिती दिल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
पोलीस स्टेशन हद्दीतील इतर सर्व गावांतील महिला भगिनी, बचत गट, सामाजिक संघटना व नागरिकांनीही या गावाचा आदर्श घेऊन आपल्या परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका, गुटखा, अमली पदार्थ तसेच इतर कोणत्याही बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी. समाजहितासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सहकार्यानेच गुन्हेमुक्त, व्यसनमुक्त व सुरक्षित समाज निर्माण होऊ शकतो.
यावेळी API कल्याणी वर्मा यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की, “अवैध धंद्यांविरोधातील तुमचा लढा हा तुमच्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांना सहकार्य करा. तुमच्या धाडसामुळे अनेक कुटुंबे व्यसनमुक्त व सुरक्षित जीवन जगू शकतील. इतर गावांतील महिलांनीही पुढाकार घेऊन समाजहितासाठी पोलिसांना माहिती द्यावी. तुमची ओळख गोपनीय ठेवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

0 Comments