*पाचोरा येथील वृषांक अहिरेची कोलंबिया विद्यापीठाच्या मशीन लर्निंग समर स्कूलसाठी निवड; एनटीयू सिंगापूरच्या पीएच.डी. कार्यक्रमात थेट प्रवेश*
पाचोरा : जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, येथील वृषांक अजय अहिरे याने अमेरिकेतील नामांकित कोलंबिया विद्यापीठाची प्रतिष्ठित 'मशीन लर्निंग समर स्कूल' यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या समर स्कूलसाठी जगभरातून केवळ २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये बहुतांश पीएच.डी. अभ्यासकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, जगभरातून निवड झालेल्या अवघ्या दोन पदवीपूर्व (Undergraduate) विद्यार्थ्यांमध्ये वृषांकचा समावेश असल्याने, कोलंबिया विद्यापीठाने त्याला 'Merit Grant' देत त्याचा सर्व खर्च उचलला आहे. वृषांकने नुकतीच आयआयटी रोपड (IIT Ropar) येथून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील बी.टेक. (B.Tech. in Computer Science and Engineering) पदवी पूर्ण केली आहे. या यशानंतर त्याची पूर्ण शिष्यवृत्तीसह (Merit Research Scholarship) नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU), सिंगापूर येथील कॉम्प्युटर सायन्स पीएच.डी. कार्यक्रमासाठी थेट निवड झाली आहे. 'CSRankings' नुसार कॉम्प्युटर व्हिजन क्षेत्रात 'NTU' हे जगातील अव्वल तीन विद्यापीठांपैकी एक मानले जाते.
पदवी शिक्षणादरम्यान त्याने चार आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप पूर्ण केल्या असून, मोनॅश युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), पेकिंग युनिव्हर्सिटी (चीन), एनटीयू (सिंगापूर) आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मेडिकल स्कूल (अमेरिका) येथील तज्ज्ञांसोबत विविध प्रकल्पांवर काम केले आहे. याशिवाय, देशातील प्रथम क्रमांकाचे 'भारतीय विज्ञान संस्था' (IISc Bangalore) येथील 'Bridging AI and Healthcare' या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली होती; जिथे देशभरातील नामांकित डॉक्टरांच्या सहभागात तो सर्वात लहान वयाचा अभियंता होता. त्याचे मुख्य कार्यक्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ऑप्टिमायझेशन, डीपफेक प्रतिमा व आवाज ओळख (audio-visual Deepfake detection), भावना विश्लेषण (emotion analysis), तसेच EEG व न्यूरोइमेजिंग (Neuroimaging) च्या साहाय्याने अपस्मार (Seizure) आणि अल्झायमर (Alzheimer's Disease) ओळख या विषयांवर आहे. वृषांकचे १० शोधनिबंध (Research Papers) जागतिक स्तरावरील CVPR, IJCNN, IEEE HiPC यांसारख्या परिषदांमध्ये, तसेच 'Elsevier Pattern Recognition' आणि 'Elsevier Neural Networks' या नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रासोबतच त्याने विविध राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धांमध्येही यश मिळवले असून, गूगल (Google) हॅकथॉनमध्ये राज्यस्तरीय विजेतेपद आणि स्वतःच्या स्टार्टअपसाठी ह्युंदाई (Hyundai) शिष्यवृत्ती देखील प्राप्त केली आहे.
त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे पाचोरा, जळगाव जिल्हा आणि आयआयटी रोपडचे नाव उंचावले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो एक मोठा प्रेरणास्थान ठरला आहे. वृषांक हा पी.टी.सी. संचलित भडगाव येथील सौ. सु.गी. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ए. बी. अहिरे आणि ए.बी. पेट्रोलियमच्या संचालिका सौ. कीर्ती अहिरे यांचा सुपुत्र आहे.

0 Comments