*"शिक्षक पित्याचा धाडसी निर्णय – मुलीसाठी झेड.पी. शाळेची निवड!"*
आजच्या काळात जिथे बहुतेक शिक्षक स्वतः जिल्हा परिषद शाळेत काम करत असूनही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांमध्ये पाठवतात, तिथे एका शिक्षक पित्याने समाजासमोर वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
कु. वंशिका भूषणकुमार जगताप हिचे वडील श्री. भूषणकुमार देविदास जगताप हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपुरे ता:– पाचोरा जि:– जळगाव येथे सायन्स पदवीधर शिक्षक असून त्यांनी आपल्या मुलीचा दाखला इयत्ता 1ली त खासगी शाळेऐवजी थेट जिल्हा परिषद शाळेत घेतला आहे. हा निर्णय केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता, समाजासाठी एक संदेश देणारा ठरला आहे.
"सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जातं, संसाधनं आहेत, सक्षम शिक्षक आहेत. मग आमच्या मुलीसाठी तीच शाळा का नाही?" असा स्पष्ट सवाल या शिक्षक पित्याने समाजाला केला आहे.
"जिल्हा परिषद शाळा ही आमच्यासाठी नोकरीचं ठिकाण नाही, ती गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी मंदिर आहे. इथेच आमच्या मुलीचं भविष्य घडेल," असा विश्वास या शिक्षक पित्याने व्यक्त केला.
त्यांच्या या निर्णयामुळे पालक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून जिल्हा परिषद शाळांकडे पुन्हा एकदा विश्वासाने पाहण्याची सुरुवात झाली आहे. शिक्षणाचा खरा दर्जा इंग्रजी भाषेत नसून मातृभाषेतून शिक्षण आणि शिक्षकांच्या समर्पणात आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे.
हा निर्णय समाजातील पालकांना झोपेतून जागं करणारा असून शासकीय शिक्षणव्यवस्थेवरचा विश्वास पुनर्स्थापित करणारा आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण हे केवळ विनामूल्यच नव्हे, तर गुणवत्तापूर्ण देखील आहे, यावर शिक्कामोर्तब करणारे हे पाऊल संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी निर्णयाबाबत संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आ.समाधान महाजन दादा यांनी चिंचपुरे शाळा भेट वेळी जगताप सरांचा व मुलगी वंशिका हिचा सत्कार करून कौतुक देखील केले आहे. तर सर्व पालकांनी हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन इंग्रजी शाळांपेक्षा मातृभाषेतील शिक्षणाकडे म्हणजे जिल्हा परिषद शाळांकडे आपला कल वाढवावा ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

0 Comments