📰 पाचोरा येथे सांधे व गुडघेदुखी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचोरा प्रतिनिधी :
आज दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी पाचोरा शहरात मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटल, अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान आणि सुनील नेत्रालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने सांधे रोपण व गुडघेदुखी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन थाटामाटात झाले असून, शिबिरात मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. कपिल कापडणीस यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कापडणीस यांनी पाचोरा शहरासह तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या १४५ रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला, औषधोपचार तसेच पुढील उपचाराची माहिती दिली.
गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडे व सांधे संबंधित आजारांनी त्रस्त रुग्णांची या शिबिरात तपासणी करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व संचालक मंडळ, सुनील नेत्रालयाचे डॉक्टर व कर्मचारीवर्ग तसेच शताब्दी हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना मोफत तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन व नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाली. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकडून आयोजक संस्थांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.

0 Comments