*पाचोर्‍यात पोलिसांची धाडसी कारवाई – १८ धारदार तलवारी जप्त.!!!*



पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहरात पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करत १८ धारदार तलवारी जप्त करून मोठा गुन्हा उघड केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे पुलाजवळील तारमिया बाबा दर्ग्याजवळ काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री सुमारे पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.


या कारवाईत सोहिल तलवार नावाच्या संशयित तरुणाकडून १८ धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. या तलवारी नेमक्या कोणत्या उद्देशाने आणल्या होत्या आणि त्या कुठून आणल्या गेल्या याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. या शस्त्रांचा वापर गुन्हेगारी कारवाया, दहशत निर्माण करणे किंवा कोणत्यातरी मोठ्या कटासाठी करण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. तात्काळ आणि नेमकी कारवाई झाल्याने संभाव्य अनर्थ टळला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


सध्या पोलिसांनी संशयित आरोपीसह इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. पाचोरा शहरात या कारवाईमुळे कायद्याचा धाक पुन्हा अधोरेखित झाला असून, पोलिस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखता येईल.