पाचोरा शहरात पोलिसांची धडक कारवाई; १८ तलवारी जप्त



पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्रविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीचे डाव उधळले असून नागरिकांकडून पाचोरा पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


गुप्त माहितीवरून पोलिसांचा सापळा


दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात अवैध शस्त्र विक्रीसाठी तलवारी आणण्यात आल्या आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने माहिजी नाका परिसरात सापळा रचला. सापळ्यात सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभुमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आले.



आरोपीची कबुली आणि शस्त्रसाठा उघडकीस


चौकशीदरम्यान सोहेल शेख याने विक्रीसाठी आणलेल्या तलवारींपैकी काही आधीच विकल्या गेल्याची कबुली दिली. उरलेल्या तलवारी त्याने लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन १८ तलवारी (अंदाजे किंमत ५४ हजार रुपये) हस्तगत केल्या. जप्त केलेल्या तलवारी उच्च प्रतीच्या असून त्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कारवायांसाठी वापरल्या जाऊ शकल्या असत्या, अशी प्राथमिक माहिती आहे.



कायदेशीर कारवाई


या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ४६०/२०२५ नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर


भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५


महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) आणि १३५

अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.


वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाची भूमिका


ही संपूर्ण कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत (ब.क्र. ९९०), जितेंद्र पाटील (ब.क्र. १६०९) आणि हरीष परदेशी यांनी सक्रिय सहभाग घेतला.