पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त.!!!



आमदार किशोर आप्पा पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन


पाचोरा/भडगाव –

पाचोरा आणि भडगाव तालुक्यात 16, 22 आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या विक्राळ अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झाला असून शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीवर तात्काळ मदत मिळावी यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करून तीनपट आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.


आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनीत पाणी साचल्यामुळे पिके सडून गेली असून शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही उत्पन्न येण्याची शक्यता नाही. पाटील यांनी स्वतः मतदारसंघातील परिस्थितीची पाहणी करून कृषी व महसूल प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनाम्यात 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


पर्जन्यमान विक्रमी पातळीवर


पाचोरा तालुक्यात केवळ तीन दिवसांत विक्रमी पाऊस कोसळला.


16 सप्टेंबर रोजी 114.8 मिमी


22 सप्टेंबर रोजी 147.8 मिमी


23 सप्टेंबर रोजी 139.3 मिमी पाऊस नोंदवला गेला.

सप्टेंबर महिन्याचा सरासरी पाऊस 136.4 मिमी असताना यावर्षी तब्बल 257.8 मिमी पाऊस झाला असून हा सरासरीपेक्षा 189 टक्क्यांनी अधिक आहे.

भडगाव तालुक्यातही 23 सप्टेंबर रोजी 90.70 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.



शेती व जनावरांचे प्रचंड नुकसान


अतिवृष्टीमुळे शेतातील फळबागा, ठिबक सिंचन यंत्रणा, पाईपलाईन, विहिरी, बंधारे आणि पक्के रस्ते पूर्णतः नष्ट झाले आहेत. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले असून दुधाळ जनावरे, बैल, गायी, बकऱ्या, कोंबड्या यांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. तसेच मळणी यंत्रणा, शेतीसाठी लागणारी अवजारेही वाहून गेली आहेत. पाचोरा व भडगाव शहरातील व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.


2019 च्या निकषांनुसार मदतीची मागणी


पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये 2019 मध्ये झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ज्या निकषांनुसार एनडीआरएफच्या मदतीच्या तीनपट आर्थिक सहाय्याचा निर्णय घेतला होता, त्याच धर्तीवर पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळावी.


“मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अद्याप त्यांना भरपाई मिळालेली नाही. आता या अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी ठाम मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.