*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी रतीलाल पाटील यांची नियुक्ती...*
भडगाव प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी १ वाजता भडगाव येथील नुराणी लॉन्स येथे पार पडली. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोरभाऊ रायसाकडा, विभागीय अध्यक्ष राकेशभाऊ सुतार तसेच मा. तालुकाध्यक्ष अध्यक्ष अशोकबापू परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीत येत्या ६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याचबरोबर भडगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी नियुक्त करण्याबाबत सखोल चर्चा झाली. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत संघाचे विद्यमान अध्यक्ष भास्कर पाटील महिंदळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर भडगाव तालुका अध्यक्षपदासाठी रतीलाल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. रतीलाल पाटील यांच्या निवडीमुळे संघटनेला अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. दरम्यान, पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर पाटील यांचीही सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. संघटनेतील त्यांचा अनुभव आणि कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या प्रसंगी संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी अध्यक्ष अशोकबापू परदेशी यांच्या हस्ते मनापासून अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीच्या शेवटी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा आणि संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भडगाव तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांच्या हितासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

0 Comments