धरणगावचा धक्का,पाचोऱ्यात पाटीलांचा दबदबा..! शिवसेनेत मोठ्या खांदेपालटचे संकेत?
गुलाबराव पाटलांची कामगिरी प्रश्नांकित; जळगावात शिवसेनेत संघटनात्मक खांदेपालटाची शक्यता
जळगाव =जिल्हा प्रतिनिधी
राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. काही ठिकाणी अपेक्षित निकाल लागले असले, तरी सत्ताधारी शिवसेनेला काही ठिकाणी अनपेक्षित धक्के बसले असून, यामुळे जिल्ह्यातील अंतर्गत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धरणगावमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाविकास आघाडी प्रणीत धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी २,४१७ मते मिळवत महायुती समर्थित उमेदवार वैशाली भावे यांचा पराभव केला. या निकालामुळे गुलाबराव पाटील यांची स्थानिक राजकीय पकड सैल होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही तुलनेने कमकुवत विरोधक असूनही गुलाबराव पाटील यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता नगरपालिका निवडणुकीत झाल्याने त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पाचोरा-भडगावात किशोर पाटलांचे वर्चस्व कायम
एकीकडे पालकमंत्र्यांना धक्का बसलेला असताना, दुसरीकडे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्यासह बलाढ्य विरोधकांची मोठी फौज उभी होती.
तरीही किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणत ‘वन मॅन शो’ दाखवून दिला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील त्रिशंकू लढतीत मिळवलेल्या विजयाचीच पुनरावृत्ती नगरपालिका निवडणुकीत झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
‘स्वबळाचा’ नारा ठरला प्रभावी
भाजपविरोधात ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याचा स्पष्ट संदेश देत किशोर पाटील यांनी शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. महायुतीत असूनही पक्षाची स्वतंत्र ओळख टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
संघटनात्मक बदलांची चर्चा
किशोर पाटील यांची ही आमदारकीची तिसरी टर्म असून, त्यांचा राजकीय आलेख सातत्याने उंचावत आहे. याउलट, पालकमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात झालेला पराभव शिवसेनेसाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, विरोधकांना प्रभावीपणे सामोरे जाणाऱ्या किशोर पाटील यांच्यावर अधिक जबाबदारी दिल्यास जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होऊ शकतो. आगामी काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घडामोडींची दखल घेऊन काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments