*आमदार किशोर पाटील यांच्या तक्रारीनंतर ; जळगाव शिक्षण माफियावर आयुक्तांचा हातोडा चालणार ..!*
जळगाव | जिल्हा प्रतिनिधी (सोनु परदेशी)
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिक्षण विभागाकडे केलेल्या गंभीर तक्रारींनंतर अखेर प्रशासनाला जाग येत असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षण आयुक्त आज, सोमवार दि. ५ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा असून, यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ज्या शिक्षण व्यवस्थेचा गाभा विश्वासावर उभा आहे, त्या व्यवस्थेलाच पोखरणाऱ्या बोगस शालार्थ आयडी, बनावट शिक्षक व पगार घोटाळ्यांवर अखेर प्रकाश पडणार का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
तक्रारीनंतर हालचाल सुरू होताच तक्रारग्रस्त संस्थाचालकांचे धाबे दणाणले असून, अनेक ठिकाणी कागदपत्रे “साफसफाई”च्या लगबगीने हलवली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. वर्षानुवर्षे “सगळं व्यवस्थित आहे” असा देखावा करणाऱ्या संस्थांमध्ये अचानक भीतीचे वातावरण पसरले आहे.
==================================================
तक्रारींमध्ये नेमकं काय?
==================================================
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या तक्रारी म्हणजे थेट शिक्षण माफियावर केलेला हल्लाच असल्याचे जाणकारांचे मत आहे.
तक्रारींमध्ये—
अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावावर शालार्थ आयडी तयार करून शासनाचा पगार लाटणे,
प्रत्यक्ष शाळेत न येणाऱ्या “कागदी शिक्षकांना” नियमित वेतन,
नियमबाह्य पदभरती, बोगस मान्यता आणि आर्थिक अनियमितता,
काही संस्थांमध्ये शिक्षक नसतानाही लाखोंचा पगार काढल्याचा संशय
असे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. ही केवळ प्रशासकीय चूक नसून थेट शासनाची लूट असल्याचा आरोप उघडपणे करण्यात आला आहे.
===================
आयुक्तांचा दौरा – चौकशी की दिखाऊ पाहणी?
===============
सूत्रांच्या माहितीनुसार, शिक्षण आयुक्त जिल्ह्यातील तक्रारग्रस्त संस्थांची प्रत्यक्ष पाहणी, शालार्थ प्रणालीतील संशयास्पद आयडींची तपासणी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवणार आहेत.
मात्र खरा प्रश्न असा आहे की,
👉 ही चौकशी फक्त कागदोपत्री राहणार की प्रत्यक्ष कारवाईपर्यंत जाणार?
जिल्हा शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि संस्थाचालकांना समन्स दिले जातील, अशी शक्यता असली तरी “मोठे मासे सुटणार का?” हा संशय शिक्षण वर्तुळात व्यक्त होत आहे.
================
बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा अधिकृत भांडाफोड होणार का?
================
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी प्रकरण दबक्या आवाजात चर्चेत आहे.
आजवर अनेक वेळा तक्रारी झाल्या, बातम्या प्रसिद्ध झाल्या;
पण—
कुणावर ठोस कारवाई नाही
कुणाची मान्यता रद्द नाही
कुणावर गुन्हा दाखल नाही
म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतोय,
“हा दौरा खऱ्या अर्थाने भांडाफोड करणार की पुन्हा एकदा फाईल बंद होणार?”
================
संस्थाचालकांवर कारवाई होणार की ‘मानाचा मुजरा’?
================
तक्रारी सिद्ध झाल्यास—
संबंधित संस्थांची मान्यता रद्द,
संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे,
दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई,
शासनाची लुटलेली रक्कम वसूल
अशी कारवाई अपेक्षित आहे.
मात्र जाणकारांच्या गोटातून तीव्र शंका व्यक्त केली जात आहे—
👉 “कोट्यवधींचा फायदा घेणाऱ्या संस्थाचालकांचा मानाचा मुजरा करून आयुक्त निघून तर जाणार नाहीत ना?”
================
शिक्षण वर्तुळाची नजर आयुक्तांच्या दौऱ्यावर
================
या घडामोडींकडे प्रामाणिक शिक्षक, पालक, शिक्षक संघटना आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“दोषींवर कठोर कारवाई झाली तरच शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकेल,” अशी ठाम भूमिका व्यक्त होत आहे.
आज होणारा शिक्षण आयुक्तांचा दौरा जळगावच्या शिक्षण व्यवस्थेसाठी निर्णायक ठरणार की केवळ औपचारिक भेट ठरणार?
हा दौरा शिक्षण माफियाच्या मुळावर घाव घालणार की पुन्हा एकदा ‘सगळं आलबेल’चा शिक्का मारणार?
याची उत्तरं आज मिळतील…
तोवर मात्र जळगावच्या शिक्षण क्षेत्रात भीती, चर्चा आणि संशयाचं वातावरण गडद झालं आहे.

0 Comments