*लोहारी गावच्या सुपुत्राला साश्रूनयनांनी निरोप* 



 *वरखेडी, ता. पाचोरा :* 


 पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान बापू कोळी यांना वीरमरण आले. जलपाईगुडी येथील रेल्वे स्थानकावर त्यांना चक्कर येऊन हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.


बापू कोळी यांची पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणुकीसाठी ९० जवानांच्या पथकात नियुक्ती करण्यात आली होती. कर्तव्यावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ ऑगस्ट २००२ रोजी बापू कोळी यांनी सीआयएसएफमध्ये प्रवेश केला होता. पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.


बापू कोळी यांचे पार्थिव पश्चिम बंगालहून विशेष विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या मूळ गावी लोहारी येथे ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता पार्थिव दाखल झाले.


तिरंगा रॅलीतून साश्रू नयनांनी अखेरचा निरोप


सजवलेल्या ट्रॅक्टरवरून गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर पोलिस दलातर्फे तीन फैऱ्या झाडून शासकीय सलामी देण्यात आली. तसेच उपस्थित सीआयएसएफ जवानांनीही सलामी दिली. त्यांचा मुलगा तन्मय यांनी अग्नीडाग दिला.


 यावेळी विविध मान्यवरांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमदार किशोर पाटील यांच्या वतीने सुमित पाटील, वैशाली सूर्यवंशी, माजी सभापती सुभाष पाटील, डॉ. भरत पाटील, भैरवी वाघ पलांडे, राजेंद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, तहसीलदार विजय बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा, जिल्हा सैनिक अधिकारी विश्वनाथ उगले, सीआयएसएफचे एएसआय एम. एल. पाटील उपस्थित होते