स्टॅम्प वेंडरच्या  धाडसीघरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास...!




जळगाव/शिरसोली (प्रतिनिधी) : शिरसोली प्र.बो. येथे स्टॅम्प वेंडरच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (५ मे) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजेंद्र दौलत बारी (रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) हे जळगाव तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प वेंडर म्हणून कार्यरत आहेत. सलग तीन दिवस सुटी असल्याने ते १ मे रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. कोठीत ठेवलेली दोन तोळ्यांची सोन्याची पोत, दीड तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची कर्णफुले, देवी-देवतांचे चांदीचे दागिने तसेच रोख १५ हजार रुपये असा मोठा ऐवज चोरून नेण्यात आला.

दि. ५ मे रोजी सकाळी राजेंद्र बारी हे पुण्यावरून घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक राहुल तायडे, पोहेकॉ प्रदीप चौधरी, धनराज गुळवे आणि चेतन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

तपासासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.