पोलिसांची धडक कारवाई; ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
शिरपूर (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांविरोधात शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील हाडाखेड तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली असून, हरियाणातील एका चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सैंधवा येथून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमधून (क्रमांक आरजे ३२ जीबी ४०३६) मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडाखेड तपासणी नाक्यावर रात्री उशिरापर्यंत सापळा रचला.
संशयित कंटेनर नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली. चालक सतीशकुमार पुडाराम जाट (वय ४४, रा. हरियाणा) याच्याकडे वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. मात्र त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
त्यानंतर कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये विविध विदेशी कंपन्यांच्या मद्याचे शेकडो बॉक्स आढळून आले. या मद्यसाठ्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी विदेशी मद्यसाठ्यासह कंटेनर असा एकूण ४३ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अवैध मद्यसाठ्याचा पुरवठा नेमका कुठे होणार होता, याचा तपास सुरू आहे. तसेच या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.
शिरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, परिसरात पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.

0 Comments