पाचोऱ्यात अवैध वृक्षतोडीचा कहर ...
'लहुजी संघर्ष सेना' चे प्रदेश अध्यक्ष गुरुदास भालेराव आक्रमक...!!
उन्हाच्या झळांत हिरवी झाडे कापून सॉ-मिलकडे खुलेआम वाहतूक, नागरिकांमध्ये संताप
पाचोरा शहर व तालुक्यात सध्या अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने ही गंभीर बाब ठरत आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरही हिरवीगार, डेरेदार झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जात असल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काही वृक्षतोडीचे व्यापारी रात्री व पहाटेच्या सुमारास बेकायदेशीररीत्या झाडे तोडून ती पाचोरा येथील सॉ-मिलवर वाहतूक करीत आहेत. या प्रकारात कोणतीही भीती किंवा कायद्याची पर्वा न करता
खुलेआम झाडांची तोड सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सध्या उष्णतेची लाट तीव्र असताना झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याने पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत तात्काळ कारवाई करून अवैध वृक्षतोडीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, अवैध वृक्षतोड थांबविण्यात आली नाही तर 'लहुजी संघर्ष सेना'च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे गुरूदास भालेराव यांनी दिला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

0 Comments