पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत ४.२६ कोटींची वसुली; १३० प्रकरणांचा निपटारा




पाचोरा (प्रतिनिधी) :

पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा आणि पाचोरा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्री. एस. व्ही. निमसे, तालुका विधी सेवा समिती पाचोरा अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पाचोरा तहसीलदार विजय बनसोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

राष्ट्रीय लोकअदालतीत मुख्य न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे आणि सहन्यायाधीश श्री. जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून तब्बल ३ कोटी ७० लाख ३६ हजार ६७६ रुपयांची वसुली करण्यात आली.

तसेच २४ वादपूर्व प्रकरणांचाही यशस्वी निपटारा करण्यात आला असून त्यातून ५५ लाख ८४ हजार ८८५ रुपयांची वसुली झाली. अशा प्रकारे एकूण १३० प्रकरणांचा निपटारा करत ४ कोटी २६ लाख २१ हजार ५६१ रुपयांची एकत्रित वसुली करण्यात आली.

या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. एस. व्ही. निमसे, लोकन्यायालयाच्या पंच ॲड. भाग्यश्री महालपुरे, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण बी. पाटील, उपाध्यक्ष ॲड.श्रीमती कविता मासरे(रायसाकडा),  यांच्यासह सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, बँक अधिकारी व कर्मचारी, बीएसएनएल, एमएसईबीचे कर्मचारी, पाचोरा पोलीस स्टेशन व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी नागरिकांनी भविष्यातही जास्तीत जास्त प्रमाणात लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.