भडगावातून संशयास्पद फोर्टिफाइड तांदळाची वाहतूक; आयशर ट्रक तहसील कार्यालयात जमा
३०० गोण्यांमध्ये तब्बल १५० क्विंटल तांदूळ; बिलांपासून मालाच्या मूळ स्त्रोतापर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित
पाचोरा=भडगांव प्रतिनिधी (किशोर रायसाकडा)
भडगांव शहरातून चाळीसगावहून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या एका आयशर ट्रकमधून संशयास्पद स्वरूपाचा फोर्टिफाइड तांदूळ वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ट्रक तहसील प्रशासनाने ताब्यात घेऊन भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. या कारवाईनंतर तांदूळ नेमका कोणत्या शासकीय योजनेसाठी होता, त्याची वाहतूक कुठे व कोणाच्या आदेशाने होत होती, तसेच संबंधित कागदपत्रे खरी आहेत का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास चाळीसगावकडून पाचोऱ्याच्या दिशेने जाणारा एमएच-५२-०१३८ क्रमांकाचा आयशर ट्रक पत्रकारांच्या निदर्शनास आला. ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या असल्याचे दिसून आल्याने वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ट्रक चालकाने भडगाव शहरातील चाळीसगाव रोड ते पाचोरा रोड असा ट्रक वेगाने पुढे नेल्याने संशय अधिक बळावला.
पत्रकारांनी ट्रकचा पाठलाग करून पाचोरा रोडवरील संतोषी माता मंदिराजवळ तो थांबवला. यावेळी चालकाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने परिस्थितीबाबत संबंधित महसूल व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर नायब तहसीलदार रमेश देवकर, एस. डी. सोनवणे आणि पुरवठा अधिकारी हर्षल भदाणे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांनी ट्रकची पाहणी केल्यानंतर तो भडगाव तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आला.
५० किलोच्या ३०० गोण्या; तब्बल १५० क्विंटल तांदूळ ताब्यात
तहसील कार्यालयात ट्रक उघडून पाहणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या सुमारे ३०० गोण्या आढळून आल्या. म्हणजेच एकूण सुमारे १५० क्विंटल तांदूळ असल्याचे समोर आले.
या तांदळाचा पंचनामा करून माल प्रशासनाने ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी तांदळाचे नमुने घेण्यात आल्याची माहिती आहे. नमुने प्रयोगशाळेत पाठवून तांदळाचा प्रकार, गुणवत्ता आणि तो नेमका कोणत्या योजनेशी संबंधित आहे, याची पडताळणी होणे अपेक्षित आहे.
गोण्यांवरील लेबलमुळे संशयाला मिळाले बळ
या गोण्यांवर ‘फोर्टिफाइड राईस’ असल्याचे नमूद असून, त्यामध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी-१२ यांसारखी सूक्ष्म पोषक तत्त्वे असल्याचे लेबलवर नमूद आहे. तसेच ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ असा स्पष्ट उल्लेखही गोण्यांवर असल्याचे दिसून आले.
गोण्यांवर FSSAI क्रमांक १०५१९००६०००४९५ असल्याने हा तांदूळ शासकीय वितरण व्यवस्थेतील आहे की पोषण आहार अथवा अन्य शासकीय योजनेशी संबंधित आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे.
दीडशे क्विंटल मालाचे बिल; मात्र शहानिशेचा प्रश्न
दरम्यान, ट्रक चालकाकडे काही बिल व कागदपत्रे आढळून आल्याची माहिती असून, त्यामध्ये चोपडा येथील रोहित ट्रेडिंग कंपनीकडून १५० क्विंटल माल एस. एम. एम. फूड्स प्रोसेसर्स, वरखेडी, ता. पाचोरा यांना विक्री केल्याचे दाखविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, ही कागदपत्रे प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंधित आहेत का? संबंधित कंपन्यांना अशा प्रकारचा फोर्टिफाइड तांदूळ खरेदी-विक्री करण्याचा अधिकार आहे का? मालाचा मूळ स्रोत कोणता? वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी व कागदपत्रे होती का? तसेच ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ असा उल्लेख असलेला तांदूळ खासगी व्यवहारातून कसा आणि कुठे जात होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन दिवस उलटूनही कागदपत्रांची शहानिशा पूर्ण झाली का?
ट्रक तहसील कार्यालयात जमा होऊन दोन दिवस उलटत असतानाही संबंधित बिलांची आणि कागदपत्रांची शहानिशा पूर्ण झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘हा तांदूळ नेमका कोणाचा?’ — नागरिकांचा सवाल
फोर्टिफाइड तांदळाच्या गोण्यांवर शासकीय वितरणाशी संबंधित असल्याचा संशय निर्माण करणारे उल्लेख आणि ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ अशी सूचना असताना हा माल खासगी स्वरूपाच्या बिलांसह वाहतूक होत असल्याचे समोर आल्याने हा तांदूळ नेमका कोणाचा आणि कोणत्या योजनेचा? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणात तहसील प्रशासनाने तांदळाचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल, मालाच्या मूळ स्त्रोताची चौकशी, बिलांची सत्यता, संबंधित व्यापारी व प्रक्रिया केंद्राची भूमिका आणि ट्रकच्या वाहतुकीचा उद्देश यांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.
कारवाई केवळ पंचनाम्यापुरतीच राहणार की पुढे गुन्हाही दाखल होणार?
ट्रक ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असला तरी या प्रकरणाची पुढील दिशा महत्त्वाची ठरणार आहे. तपासणीत माल शासकीय योजनेशी संबंधित असल्याचे किंवा नियमबाह्य पद्धतीने त्याची वाहतूक/विक्री होत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, तहसीलदार शितल सोलाट यांनी या तांदळाचा नेमका स्रोत आणि तो रेशन दुकानासाठी आहे की पोषण आहारासाठी, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळा अहवाल आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रशासन नेमका कोणता निष्कर्ष काढते, याकडे भडगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
१५० क्विंटल फोर्टिफाइड तांदळाचा हा नेमका व्यवहार काय? मालाचा मूळ स्रोत कोणता? बिलांची सत्यता काय? आणि ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ असा उल्लेख असलेला तांदूळ खासगी वाहतुकीत कसा आला? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या सखोल चौकशीतूनच समोर येणे अपेक्षित आहे.

0 Comments