*नेदरलँड्समध्ये आयुष भांडारकर यांची आंतरराष्ट्रीय कृषी व्यवसायातील उल्लेखनीय भरारी!*
युरोपियन कृषी क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेत शेतकरी हितासाठी मायभूमीत परतण्यास सज्ज.
(किशोर रायसाकडा)
नगरदेवळा येथील आयुष प्रणय भांडारकर यांनी नेदरलँड्समधील प्रतिष्ठित Van Hall Larenstein University of Applied Sciences येथून International Agribusiness and Trade या विषयातील पदवी यशस्वीपणे प्राप्त करून उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे भांडारकर कुटुंबासह नगरदेवळ्याच्या शैक्षणिक व कृषी क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आयुष भांडारकर हे अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर यांचे सुपुत्र आहेत. गेली जवळपास पाच दशके शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र म्हणून कार्यरत असलेल्या अनुप कृषी केंद्राच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी जोडलेल्या भांडारकर कुटुंबाची तिसरी पिढी आधुनिक व आंतरराष्ट्रीय कृषी व्यवसायाचे ज्ञान घेऊन शेतकरी हितासाठी सज्ज होत आहे, ही विशेष बाब मानली जात आहे.
निर्मल इंटरनॅशनल स्कूलपासून आंतरराष्ट्रीय विद्यापीठापर्यंतचा प्रवास :- आयुष भांडारकर यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे पूर्ण केले. शालेय जीवनातच नेतृत्वगुण, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी डॉं. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथे ॲग्रिबिझनेस मॅनेजमेंट विषयातील पदवी शिक्षणास सुरुवात केली. महाविद्यालयाच्या 2+2 आंतरराष्ट्रीय पदवी अभ्यासक्रमांतर्गत त्यांना नेदरलँड्समध्ये पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळाली.
*नेदरलँड्समध्ये कृषी व्यवसायाचे आधुनिक धडे :-* Van Hall Larenstein University of Applied Sciences येथे International Agribusiness and Trade या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतांना आयुष याने केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता युरोपमधील आधुनिक कृषी व्यवस्थेचा प्रत्यक्ष अभ्यास केला. दुग्धव्यवसाय, अन्नप्रक्रिया उद्योग, फुलशेती, कृषी व्यापार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि आधुनिक कृषी व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी कृषी व्यवसायातील आधुनिक संकल्पना समजून घेतल्या. युरोपियन कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, व्यवस्थापन पद्धती, मूल्यवर्धन, कृषी उत्पादनांचे विपणन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा अनुभव भविष्यात भारतीय कृषी क्षेत्रासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतो.
*कुटुंबाची कृषी परंपरा आणि आधुनिक ज्ञानाची सांगड*:- भांडारकर कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्राशी जोडलेले आहे. अनुप कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा देण्याची परंपरा कुटुंबाने जपली आहे. या पार्श्वभूमीवर आयुष यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी व्यवसाय व व्यापाराचे शिक्षण घेतल्याने पारंपरिक कृषी अनुभवाला आधुनिक व्यवस्थापन आणि जागतिक बाजारपेठेच्या ज्ञानाची जोड मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*आंतरराष्ट्रीय अनुभवाचा शेतकरी हितासाठी उपयोग करण्याचा मानस* :- नेदरलँड्समधील शिक्षणामुळे आयुष यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबरोबरच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, अन्नप्रक्रिया, निर्यात, बाजारपेठ व्यवस्थापन आणि जागतिक कृषी व्यापार यांचा व्यापक अनुभव मिळाला आहे. मायभूमीत परतल्यानंतर या ज्ञानाचा उपयोग शेतकरी हित, आधुनिक कृषी व्यवसाय आणि कृषी क्षेत्रातील नवीन संधी निर्माण करण्यासाठी करण्यास ते सज्ज असल्याची माहिती आहे. आजच्या काळात शेती केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता उत्पादनापासून प्रक्रिया, ब्रँडिंग, बाजारपेठ, निर्यात आणि जागतिक व्यापारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने आंतरराष्ट्रीय शिक्षण घेतलेली तरुण पिढी कृषी क्षेत्रात कार्यरत होणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
*आयुषच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव* :- आयुष प्रणय भांडारकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक, कृषी क्षेत्रातील सहकारी आणि नगरदेवळा-पाचोरा परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मेहनत, जिद्द आणि स्वप्नांना मिळालेल्या या सुंदर यशाचा मनापासून अभिमान आहे. तुझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग भविष्यात कृषी व व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी होवो आणि तुझ्या उज्ज्वल कारकिर्दीला यशाची नवी उंची लाभो, अशा शब्दांत आयुष यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नेदरलँड्समधून मिळवलेले आंतरराष्ट्रीय कृषी व्यवसायाचे ज्ञान आणि युरोपियन कृषी क्षेत्राचा अनुभव घेऊन मायभूमीत परतणाऱ्या आयुष भांडारकर यांच्याकडून खान्देशातील शेतकरी आणि कृषी व्यवसायाला आधुनिकतेची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments