*रावेर पोलीसांची दबंग कारवाई २४ तासांच्या आत चोरांची टोळी जेरबंद तर पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त...!*



(रावेर विनोद कोळी) रावेरमध्ये जबरी चोरी करणारी टोळी 24 तासांत जेरबंद; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

रावेर (दि. 19 फेब्रुवारी 2026): रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासांच्या आत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गोवर्धनदास सफरमल कोटवाणी (रा. रावेर) हे किरणा होलसेल व रिटेल व्यापारी असून दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.45 वाजता विवरे बु. येथे ग्राहकांकडून उधारीचे पैसे गोळा करून रावेरकडे येण्यासाठी विवरे बसस्थानकावर उभे होते. त्यावेळी एका अनोळखी मोटारसायकल चालकाने “मी रावेरला जात आहे, माझ्यासोबत चला” असे सांगून त्यांना मोटारसायकलवर बसवले.

रावेरकडे येत असताना पारश्या नाल्याजवळ चौकीशेजारी शेताच्या बाजूला मोटारसायकल थांबवून तेथे उभ्या असलेल्या दोन साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांना धमकावून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 15 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व तिघेही फरार झाले.

या घटनेनंतर फिर्यादी यांनी रावेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 77/2026 भारतीय न्याय संहिता कलम 304 प्रमाणे दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा उपविभाग) व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन आरोपी 1) मोहम्मद उबेद मोहम्मद एजाज (रा. नागझिरी चौक, रावेर), 2) शेख मोईन शेख नईम (रा. विवरे बु., ता. रावेर, जि. जळगाव) व 3) रेहानखान जावेद खान (रा. विवरे बु., ता. रावेर, जि. जळगाव) यांना ताब्यात घेऊन अटक केली.

सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले 15 हजार रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 35 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक MH-02-CN-5376) जप्त करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.